मराठी भाषा

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.


मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणारयांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा १३०० वर्षांपासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मीती संस्कृत पासून महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश द्वारे झाली आहे.

मराठी भाषा भारतासह मॉरीशस व इस्रायल या देशातही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या महाराष्ट्रीय भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड येथेही बोलली जाते.


भारतात मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात व अहमदाबाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैद्राबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तामिळनाडू)


भारताचे संविधानातील २२ अनूसुचित (अधिकृत) भाषेच्या सुचीत मराठीचा समावेश आहे.मराठी, महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात व दमण आणि दीव, दादरा व नगर हवेली या केंदशासीत प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.


मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३०[संदर्भ द्या] पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.

 

श्रावणबेळगोळ येथील सर्वात जुना मराठी शिलालेख, प्रताधिकार-कामत.कॉमसर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य-काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ. स. ७३९) येथे आहे. श्रावणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आहे. हा शिलालेखात राजा गंगराय व त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत.


कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठीतील पहिला शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।': कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बर्‍यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्‍य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. विशेष म्हणजे त्यात स्पष्ट कालोल्लेख सापडतो, तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ. स. १०१८ या काळात तो कोरला आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. तो आता मागे पडला असून तो मान कुडलला मिळाला आहे. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके ९८२ होता. त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला. त्यामुळे मराठीतील आद्य शिलालेखाचा मान आता कुडलकडे आला आहे. ९४० संवत्सरात कोणी पंडिताने मंदिराला भेट दिली अशा आशय त्यात आहे.